Média indépendant, en accès libre pour tous, sans publicité, financé par les dons de ses lecteurs
Recevoir la lettre d'info

How the rich... a review in Hindi

This article upon « How the rich are destroying the earth », and upon the book « Waste » of Tristram Stuat has been published in May 2010 in the daily newspaper of Mumbai.


पृथ्वीचे मारेकरी

अतुल देऊळगावकर , रविवार, २३ मे २०१०

नासाडी हाच व्यवच्छेदक गुण असलेल्या ‘इंटरनॅशनल क्लब’च्या सभासद संख्येत अमेरिका, इंग्लंड आघाडीवर आहेत. (भारताची मजल दरमजल आश्वासक आहे.) त्यांनी चालवलेल्या अन्नाच्या नासाडीमुळे अवघ्या जगावर अरिष्ट आले आहे. स्वस्त धान्याचा अंत, वाढते भुकेले, जमिनीचा तुटवडा, जंगलावर अतिक्रमण, पर्यावरणाचा विनाश, तापणारे जग या शृंखला अभिक्रियेचे उगमस्थान अन्नाची उधळमाधळ हेच आहे. ते कसे याचे वैश्विक दर्शन ट्रिस्ट्रॅम स्टुअर्ट या तेहतीस वर्षांच्या ब्रिटिश तरुणाने ‘वेस्ट- अनकव्हरिंग द ग्लोबल फूड स्कँडल’ या पुस्तकातून घडवले आहे.
जगातील काही धनिक हेच पृथ्वीवर आलेल्या पर्यावरणीय संकटास कसे जबाबदार आहेत याची विस्तृत मांडणी ‘ल माँद’ फ्रेंच वृत्तपत्राचे पर्यावरण संपादक हेर्वे केम्फ यांनी ‘हाऊ द रिच आर डिस्ट्रॉयिंग द अर्थ’ या पुस्तकातून केली आहे. स्टुअर्टच्या प्रतिपादनाचे व्यापक विश्लेषण व विस्तार असे त्याचे स्वरूप म्हणता येईल. तीन वर्षांत ‘हाऊ द रिच आर डिस्ट्रॉयिंग द अर्थ’ हे पुस्तक आठ भाषांमध्ये गेले.
नाश पावणे हा सृष्टीचा धर्म आहे. त्या आड येऊ नये. नष्ट होणाऱ्या भौतिक बाबींचा मोह नसावा. हे ब्रह्मसत्य सर्वात आधी कोणी जाणले, यावर दावा करणारे आणि संशोधकांमध्ये मतभेद होऊ शकतात. परंतु या ब्रह्मसूत्राला अनुसरून जीवन जगणाऱ्या ‘इंटरनॅशनल क्लब’चे सभासद वरचेवर वाढत आहेत. विनाश हेच अंतिम सत्य असल्यामुळे त्या प्रक्रियेला हातभार लावणे हीच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे, हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. या क्लबचे सदस्य होण्यासाठी देश, धर्म, जात, भाषा, लिंग कुठलीही अट नाही. क्लबचे कायदेकानून नाहीत. केवळ कृती हाच निकष आणि तीच पात्रता.
नासाडी हाच व्यवच्छेदक गुण असलेल्या या ‘इंटरनॅशनल क्लब’च्या सभासद संख्येत अमेरिका, इंग्लंड आघाडीवर आहेत. (भारताची मजल दरमजल आश्वासक आहे.) त्यांनी चालवलेल्या अन्नाच्या नासाडीमुळे अवघ्या जगावर अरिष्ट आले आहे. स्वस्त धान्याचा अंत, वाढते भुकेले, जमिनीचा तुटवडा, जंगलावर अतिक्रमण, पर्यावरणाचा विनाश, तापणारे जग या शृंखला अभिक्रियेचे उगमस्थान अन्नाची उधळमाधळ हेच आहे. ते कसे याचे वैश्विक दर्शन ट्रिस्ट्रॅम स्टुअर्ट या तेहतीस वर्षांच्या ब्रिटिश तरुणाने ‘वेस्ट- अनकव्हरिंग द ग्लोबल फूड स्कँडल’ या पुस्तकातून घडवले आहे. त्यासाठी स्टुअर्टने यार्कशायर ते अमेरिका, जपान, चीन, भारत, पाकिस्तान असा प्रवास केला आहे. महिनाभर दिल्लीत मुक्काम करून, भारतीय, पाक, ब्रिटिश वृत्तपत्रांकरिता लिखाण केले आहे. सर्व स्तरांना जवळून पाहिले आहे. प्रवासाकरिता रेल्वेचा अधिकाधिक वापर केल्यामुळे त्याने समाजाला जवळून पाहिले आहे.
मायदेशातील कारखाने, हॉटेल, सुपरमार्केट, मॉल या ठिकाणांची सफर स्टुअर्ट घडवतो. मार्क अॅण्ड स्पेन्सर या कंपनीला ब्रेडच्या गठ्ठय़ामधील वरचा व खालचा ब्रेड चालत नाही. म्हणून ब्रेडच्या कारखान्यामधील २०,००० ब्रेडचे स्लाइस दररोज फेकून दिले जातात. ‘कुणाला ना मला, घाल डस्टबीनला’ ही म्हण कशी जगली जाते, हे वाचकाला उमगत जाते. उत्तम अवस्थेतील ५० कोटी दह्याचे डबे, २५ कोटी ब्रेडचे स्लाइस, ३० कोटी रुपयांची केळी, १६ लक्ष सफरचंद, १० लक्ष मांसाची पाकिटे म्हणजेच दोन कोटी टन वजनाच्या या सर्व जिनसा दरसाल ब्रिटनमध्ये कचराकुंडीत जातात. अमेरिका याहून पुढे ! तिथे एकंदरीत उत्पादनापैकी तब्बल ५० टक्के अन्न फेकून दिले जाते. ‘सुशी’ व ‘कॅव्हिएर’ या फास्ट फूडवर जपानमध्ये उडय़ा असतात. दरवर्षी सुमारे ४५०० कोटी रुपयांचे हे पदार्थ कसे नष्ट करायचे ही जपानपुढील विवंचना आहे.
फेकून देण्याचे विडंबन करताना ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटात नसिरुद्दीन शाह खाता खाता सांगतो, ‘थोडा खाओ, जादा बाहर फेक दो, मजा आता है’. ही धनदांडग्यांची मनोवृत्ती आहे. ते गरीब देशातले असोत वा श्रीमंत, गुणांमध्ये तसूभर फरक नाही. सर्वसामान्य जनतेपासून फारकत झालेले धनाढय़ जगभर आहेत. हे अन्न निर्माण करण्यासाठी किती कष्ट, वेळ व ऊर्जा खर्च झाली हा विचारसुद्धा त्यांना शिवत नाही. नासाडीबद्दल त्यांना यक्तिंचितही खेद-खंत वाटत नाही. वरचेवर नासाडी ही जीवनशैली असणारे वाढत आहेत. त्यातूनच अख्खी फळे, स्पर्श न झालेल्या पाकिटबंद फास्ट फूडचा प्रवास रेफ्रिजरेटर ते डस्टबीन असा होत आहे. उकिरडे साफ करणाऱ्या डुकरांची चंगळ होत आहे. त्याच युरोपमध्ये ४ कोटी, अमेरिकेमध्ये ३.५ कोटी, तर ब्रिटनमध्ये ४० लक्ष भुकेले राहतात, याचे भान लेखक आणून देतो.
अन्नधान्यामुळे जग एकवटलं असल्यामुळे नासाडी हा मुद्दा वैयक्तिक राहात नाही. त्याचा परिणाम जगभर दिसतो. या जगडम्वाळ नासाडीमुळे अधिक धान्याची गरज निर्माण होते. (त्यात भर म्हणून अमेरिकेने दोन वर्षांत १० कोटी टन धान्यापासून जैवइंधन केलं.) त्यातूनच गरीब राष्ट्रांच्या जमिनी बळकावून धान्योत्पादन चालू होते. लाखो हेक्टर जंगल नामशेष करून शेती होते. दुसरीकडे धान्याची प्रचंड वाहतूक, साठवण व प्रक्रियेवरचा खर्च अक्षरश : बाद ठरतो. शेतापासून ताटात अन्न पडेपर्यंत (अथवा कुजेपर्यंत) प्रत्येक टप्प्यावर ऊर्जा लागते. कर्ब वायूंचे उत्सर्जन होते. समस्त घनकचरा अजस्र खड्डय़ात साठवला जातो. तिथे तो कुजवला अथवा जाळला जातो. एका सर्वेक्षणानुसार युरोपमधील ३३ टक्के कर्बवायूंचे उत्सर्जन अन्नधान्याचे उत्पादन व वाहतूक यामधून होते. जगातील अन्नधान्याचा पर्वत आणि नासाडी ही पर्यवरणीय जोखीम होऊन बसली आहे.
जगभरातील उच्च मध्यमवर्गीयांचा मांसाहार झपाटय़ाने वाढत आहे. एक अमेरिकन वर्षभरात १४३ किलो मांस खातो. एका ब्रिटिशाला ८३ किलो तर चिनी व्यक्तीला ५५ किलो मांस लागते. (भारतीय ५ किलो) आठवडय़ातून मांसाहार करण्याचे प्रमाण आता तीन-चार वर गेले आहे. वाढत्या मागणीनुसार मांस खाण्यास योग्य पशुपैदास व पशुखाद्य यांची गरज वाढते. त्यामुळे तृणधान्य (गहू, मका, बाजरी) अधिक प्रमाणात पशुखाद्य होऊ लागले. कोंबडीचे वजन एक किलो करण्याकरिता दोन किलो धान्य भरवावे लागते. तीन किलो तृणधान्याने पोसल्यावर एक किलो डुकराचे मांस तयार होते. तर, एक किलो बैलाचे मास तयार होण्यापूर्वी आठ किलो धान्य पसार होत असते.
हे अन्नधान्य वाया गेलं नसतं तर कुणाच्या पोटात गेलं असतं, हा भाबडा आशावाद आहे असं कोणी म्हणू शकेल. धनवान व गरीब देशांकरिता जागतिक बाजारपेठ एकच आहे ही वस्तुस्थिती आहे. धनवानांची हजारो टन खरेदी ते कचरा अशी धान्याची वाट लागते तेव्हा दरिद्री देश धान्यापासून वंचित रहात असतात. धनवानांची नासाडी आणि गरिबांची भूक याचा कार्यकारणभाव असा आहे. खरेदी कमी झाली तरी गरिबांपर्यंत अन्न पोहोचू शकते.
भारतात विवाह समारंभ व पाटर्य़ामधील नासाडी चढत्या भाजणीने वाढत आहे, असे लेखकाचे निरीक्षण आहे. शेतात तयार झालेले धान्य घरापर्यंत पोहोचण्याआधी वाहतूक, गोदाम व प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर नासधूस होते. सुमारे ६०,००० कोटी रुपयांच्या धान्याची नासाडी होते ही भारताची समस्या आहे. भारतात केवळ पाच टक्के शेतमालावर प्रक्रिया होते. तरी भारतात शिळे व उष्टय़ाचा पुनर्वापर होतो. विशेषत : जनावरांना घालण्याची पद्धत आहे. खाण्यायोग्य नसलेल्या अन्नापासून बायोगॅस करण्याची कल्पना स्टुअर्टला अतिशय भावते.
एवढय़ा विस्ताराने अन्नाच्या नासाडीचे विश्लेषण करून निवांत बसणाऱ्यांपैकी स्टुअर्ट नाही. त्याने अन्नाचा विध्वंस रोखण्याकरिता मोहीम हातात घेतली आहे. नासाडीच्या ठिकाणी भित्तिपत्रके, चित्रे लावून संवेदना जागी करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अन्नाच्या नासाडीचे सचित्र इमेल जगभर फिरत आहेत. व्यवसाय व घरी अन्नाच्या नासाडीला टाळता येणे कसे शक्य आहे याचे मार्गदर्शन करण्यात नासाडीचा जागल्या स्टुअर्टसोबत ‘द गार्डीयन’ हे जगन्मान्य वृत्तपत्र उतरले आहे.
तसेच, केवळ नैतिकतेला आवाहन करून अन्नाचा नाश रोखणे हे स्वप्नरंजन- युटोपिया ठरू नये, याकरिता स्टुअर्टने अन्न वाचवण्याचा जाहीरनामा तयार केला आहे. त्याला ‘युट्रोपिया’ उत्तम आहाराची भूमी तयार करायची आहे, जिथे अन्न फेकून दिले जाणार नाही. असा गुन्हा करणाऱ्यास शिक्षा होईल. टाकून देण्याजोगे अन्न मासे, कोंबडय़ा व गुरांकरिता वापरले जाईल. शेतकरी, ग्राहक, सुपरमार्केट सर्वानाच नासाडी थांबवण्याचा विचार कसा करावा, याचा वस्तुपाठ अखेरीस दिला आहे. www.tristramstuart.co.uk
आपण यथेच्छ जेवणे
उरले ते वाटणे
परंतु वाया दवडणे
हा धर्म नव्हे
असे रामदास स्वामींनी तेव्हाच बजावून ठेवले होते. त्याच शहाणपणाची निकड ‘वेस्ट’मधून व्यक्त केली आहे.
पृथ्वीचा विध्वंस
जगातील काही धनिक हेच पृथ्वीवर आलेल्या पर्यावरणीय संकटास कसे जबाबदार आहेत याची विस्तृत मांडणी ‘ल माँद’ फ्रेंच वृत्तपत्राचे पर्यावरण संपादक हेर्वे केम्फ यांनी ‘हाऊ द रिच आर डिस्ट्रॉयिंग द अर्थ’ या पुस्तकातून केली आहे. स्टुअर्टच्या प्रतिपादनाचे व्यापक विश्लेषण व विस्तार असे त्याचे स्वरूप म्हणता येईल. तीन वर्षांत ‘हाऊ द रिच आर डिस्ट्रॉयिंग द अर्थ’ हे पुस्तक आठ भाषांमध्ये गेले.
जगाच्या प्रदूषणात मोठा वाटा विमान व कार यांचा आहे. हजारो मीटर उंचीवर जाऊन साधारणपणे ताशी शंभर किलोग्रॅम कर्ब वायू सोडण्याचे कार्य विमान करते. एक कार दर किलोमीटरला दोनशे ग्रॅम कर्ब वायू सोडते. हवेमध्ये कर्ब वायू पसरवून जगाचा ताप वाढवणाऱ्या धनपतींच्याच हातात सत्तेच्या चाव्यांचा जुडगा आहे. कोणत्याही राष्ट्रावर सत्ता कोणत्याही राजकीय पक्षाची असो, त्यावर खरा ताबा हा काही पुढारी, उद्योगपती व नोकरशहा यांच्याकडेच असतो. ही समूहसत्ता (ऑलिगार्ची) राष्ट्रांवर आणि जगावर सत्ता गाजवत आहे. ती सर्वशक्तिमान आहे. त्यांच्या ताकदीचा सर्वसामान्यांना अंदाज येत नाही.
हीच मंडळी प्रदूषण करूनही भरपाई देत नाहीत. ‘प्रदूषण करणाऱ्यांनो भरपाई करा’ हा न्याय अमेरिका लावूनच घेत नाही. सर्व राष्ट्रे अमेरिकेच्या विरोधात एकवटली तरी फरक पडत नाही. याचे कारण अमेरिकन जनता नसून तिथल्या समूहसत्तेची दादागिरी हेच आहे. सर्व राष्ट्रांमधील समूहसत्ता साटेलोटे करून यथेच्छ फायदे लुटत राहतात.
ही समूहसत्ताच पर्यावरणाचा विनाश घडवून अजस्र संपत्ती गोळा करीत असते. जंगल नाहिसे करण्यात, समुद्रमंथन करण्यात आणि हवेत विषारी धूर सोडण्यात त्यांचा नफा पटीपटीने वाढत जातो. १९५० साली उपलब्ध जैवसंपत्तीच्या ५० टक्क्य़ांचा उपयोग केला जात असे. २००३ साली जैवसंपत्तीच्या उपभोगाचं प्रमाण १३० टक्कयांवर गेले आहे. साहजिकच ही विनाशकारी कार्यपद्धती अबाधित ठेवण्यातच त्यांचे हित आहे. पर्यावरणाचे जागतिक करार रोखण्यावर त्यांचा भर असतो. त्यात ते सहज यशस्वी होतात. ‘पृथ्वी नष्ट केली तरीही दुसरा ग्रह अस्तित्वात असल्याच्या थाटात जगातल्या कुबेरांचे वर्तन आहे.’ केम्फ घणाघाती हल्ला चढवतात.
कोपनहेगनमधील जागतिक हवामान परिषदेत व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो शावेझ यांनी धनिकांच्या ‘कर्तृत्वाचे’ पुरावे सादर केले. ‘क्योटोप्रमाणेच कोपनहेगनवर धनिक देशांचाच ताबा आहे. हे धनिक, गरीब देश, लोकशाही आणि पर्यावरणासाठी घातक आहेत. रस्त्यांवर उतरलेले कार्यकर्ते व त्यांच्या घोषणा तंतोतंत खऱ्या आहेत. पर्यावरण ही बँक असती तर केव्हाच दिवाळखोरीत निघाली असती’, असं शावेझ यांनी ठणकावलं. त्या वेळी शावेझ यांनी प्रस्तुत पुस्तक हातात घेऊन यामधील उतारे वाचून दाखवले. व्याख्यानानंतर दहा हजार श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली. शावेझ यांचे व्याख्यान पर्यावरण चळवळीमधील प्रत्येकाच्या मेलवर सापडते. केम्फ यांच्या पुस्तकाला त्यामुळे पर्यावरण चळवळीत ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
१९९१ नंतर माहिती तंत्रज्ञान व जागतिकीकरणामुळे संपत्तीच्या निर्मितीला वेग आला. त्याच गतीने विषमतादेखील वाढू लागली. २००३ साली फ्रान्समध्ये दारिद्य्ररेषेखाली (वार्षिक उत्पन्न १२५४ युरोपेक्षा कमी) ३७ लक्ष लोक होते. ही संख्या कमी न होता ती २००७ साली ७० लक्ष झाली. अमेरिका, चीन, भारत असो वा ब्राझील ; सर्वत्र हेच चित्र आहे. आज जगातील १०० कोटी जनता भूक आणि तहानेने व्याकूळ आहे. दारिद्य्राचे जागतिकीकरण असे होत आहे. सध्याची गरिबी केवळ उत्पन्नाच्या आकडय़ांमधून समजणार नाही. ते उत्तम घर, शिक्षण, आरोग्यापासून वंचित राहतात. क्रयशक्ती खूप कमी होते. दरिद्री जनतेला असह्य पर्यावरण सहन करावे लागते. शहरात रेल्वेलाइन, रस्ता, घाणीचे ढिगारे यांच्या सान्निध्यात आयुष्य कंठावे लागते. शहरे व उद्योगांसाठी जाणारे पाणी व शेतजमीन यामुळे शेतकरी व ग्रामीण भाग हैराण आहे. पर्यावरणीय कारणांसाठीच्या हिंसक घटना वाढत असून त्यांची झळ गरिबांनाच बसत आहे.
जगभर भांडवलशाहीकडून होणाऱ्या ठाम मतांचा परखड भाषेत केम्फ समाचार घेतात. ‘केवळ तंत्रज्ञान आपल्या सर्व समस्या सोडवू शकेल, या भ्रमाचा भोपळा केव्हाच फुटला आहे. तसेच वृद्धीला मर्यादा नाहीत, ती अनंत आहे. हे थोतांड आहे. बेकारी टाळता येत नाही ही पळवाट आहे. आपल्या गरजा आणि हाव यात फरक केला नाही तर पर्यावरणाचा आणि पृथ्वीचा अंत अटळ आहे. अशा कडेलोटाला आपण आलो आहोत. पर्यावरणीय आणीबाणीतून बाहेर पडण्याकरिता ते स्वत :च्या सरकारलाच सुचवतात- स्वातंत्र्य, पर्यावरण आणि बंधुता असा एकविसाव्या शतकाचा मंत्र जाहीर करा. तर वाचकांना ते सांगतात, ‘जग बदलायचे असेल तर जीवनशैली बदला. उपभोग कमी करा, वाटून घेणे, सहभागी करणे वाढवा.’
अशा भीषण परिस्थितीतही हेर्वे केम्फ निराश नाहीत. समूहसत्तेला भगदाड पडण्याची त्यांना चिन्हे दिसत आहेत. जागरूक जनतेमुळे उघड भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा लोकांच्या विरोधात जाणे परवडत नसते, असे त्यांचे निदान आहे. प्रसारमाध्यमांची भूमिका कळीची आहे, असेही त्यांना वाटते. परंतु त्यांच्या मताला ठोस आधार नाही. संपूर्ण पुस्तकातील कच्चा दुवा हाच आहे. आशावादी राहण्याचे बंधन घालून घेतल्यामुळे अशी मांडणी झाली असावी.

वेस्ट- अनकव्हरिंग द ग्लोबल फूड स्कँडल
ट्रिस्ट्रॅम स्टुअर्ट, प्रकाशक : पेंग्विन बुक्स
पृष्ठे - ४५१, किंमत - ४५०रुपये

हाऊ द रिच आर डिस्ट्रॉयिंग द अर्थ
हेर्वे केम्फ, प्रकाशक : ग्रीन बुक्स,
पृष्ठे - १२३ किंमत - ९०४ रुपये
__._,_.___


📨 S’abonner gratuitement aux lettres d’info

Abonnez-vous en moins d'une minute pour recevoir gratuitement par e-mail, au choix tous les jours ou toutes les semaines, une sélection des articles publiés par Reporterre.

S’abonner
Fermer Précedent Suivant

legende